दिंडोरी बाजार समिती विभाजणातून सुरगाणा बाजार समितीची स्थापना २७ मार्च २००३ मध्ये करण्यात आली. सुरगाणा हा नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेलगतचा डोंगरदऱ्या असलेला अदिवासी बहुल तालुका आहे. डोंगराळ भूप्रदेशामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, त्यामुळे इथे मुख्य पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. त्या नंतर वरई, तुर, उडीद, भुईमूग, नागली, हरभरे , गहू इत्यादी शेतमाल काही प्रमाणात लागवड केल्या जातो. गुजरातच्या सीमेजवळ काही ठिकाणी आंबा लागवड करतात. तसेच सापुतारा पट्ट्यामध्ये स्ट्रॉबेरी व टमाटा लागवड करतात. संपूर्ण आदिवासीबहुल तालुका असल्यामुळे येथे शासनाची एकाधिकार खरेदी योजना लागू आहे. (महाराष्ट्र जनजातीची अर्थीक स्थिती सुधारणे अधिनियम १९७६)
हि योजना लागू असणाऱ्या ठिकाणी ह्या योजनेतील नियमन केलेला शेतमाल इतर कोणीही शासनाशिवाय खरेदी करू शकत नाही असी तरतूद त्या कायद्यात केलेली आहे. भातासह सुरगाण्यात लागवड होणारी इतर सर्व पिके त्यांच्या नियमनात आहे, सुरगाणा तालुक्यात एकाधिकार व आधारभूत धान्य खरेदी योजनेच्या माध्यमातून भाताची खरेदी महाराष्ट्र राज्य सह.आदि.विका.महामंडळ मर्या.नाशिक, यांच्यासाठी उपप्रादेशिक व्यवास्थापक महाराष्ट्र राज्य सह.आदि.विका.महामंडळ मर्या.नाशिक उपप्रादेशिक कार्यालय सुरगाणा यांच्याकडून खरेदी केल्या जाते.
सुरगाणा बाजार समितीची स्थापना झाली त्याअगोदर दिंडोरी बाजार समितीने सुरगाणा शहराच्या बाजूला १ हे.३७ आर.जागा सुरगाणा उपबाजारासाठी विकत घेतली होती. तिच्या शेजारी दिंडोरी बाजार समितीने लिलाव शेड उभे केले. आज ह्या दोन इमारती गोदाम म्हणून भाड्याने दिलेल्या आहे त्यांच्या येणाऱ्या भाड्या पासून व बाजार फी पासून बाजार समितीस सुरगाणास उत्त्पन्न मिळते.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात जास्त प्रमाणात पाउस पडतो, पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी व उन्हाळ्यात पिण्यास पाणी नाही अशी परिस्थिती आसते. हा भाग डोंगर उताराचा असल्या कारणाने इथे सिंचनाच्या सुविधा मर्यादेत आहे त्यामुळे बागाईत पिके होत नाही. खरीप हंगामातील पिके घेण्याकडे कल असतो. तालुक्यातील व शेजारील गुजरात राज्यातील सिमेलगतचे काही शेतकरी कांदा लागवड करत आहे पण त्याना बाजार पेठ जवळ नसल्याने दूरवर विक्रीकरता जावे लागते. बाजार समितीने त्याचा सर्वे करून शेतकऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील इतर बाजार समितीत कांदा खरेदीचा अनुभव असणाऱ्या व्यापाऱ्या बरोबर चर्चा करून त्याना बाजार समितीचे लायसन्स दिले, त्याच बरोबर सुरगाणा बाजार समितीचे व्यापाऱ्याना एकत्र घेऊन, शेतकऱ्यांना लिलावाची माहिती पुरवून सुरगाणा येथे बाजार सामितीच्या आवारात लिलाव सुरु केले (सन २०२३ ).
बोरगांव भागात स्ट्रॉबेरी व टमाटा लागवड केली जाते. शेतकऱ्यांकडून बाजार समितीने लिलाव सुरु करणे बाबत मागणी होती. त्याआधारे सन २०२३ साली बाजार समितीने स्ट्रॉबेरी व टमाटा खरेदी केंद्रासाठी नागझरी फाटा (सराड) येथे जागा कराराने भाडेतत्वावर घेतली. त्या भागात पुरेशी जनजागृती पण करण्यात आली, जे व्यापारी ह्या मालाची शिवार खरेदी करत होते त्यांना भेटून बाजार समितीचे लायसन्स घेऊन खरेदी केंद्रावर लिलावाच्या मार्फत खरेदी करावी म्हणून अवाहन करण्यात आहे.